भंडारा - शासनाच्या आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर धान्य विक्री केल्यावर 1850 रुपये दर आणि त्याबरोबर शासनातर्फे बोनसही मिळतो. याचा फायदा घेण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात आधारभूत धान (भात) खरेदी केंद्रावर आपला धान विक्रीसाठी आणतात. मात्र, ज्या बोनससाठी शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रावर येतो, त्या बोनसचा खरा फायदा हा आधारभूत धान खरेदी केंद्र चालवणाऱ्या संस्था धारकांना आणि कर्मचाऱ्यांना होतो, असा आरोप शेतकरी करीत आहेत.
साकोली तालुक्यातील श्रीराम सहकारी भात गिरणीमध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आहे. तिथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्यांचा धान विक्रीसाठी आणला. त्यामुळे बऱ्याचदा या खरेदी केंद्राच्या गेटवर कुलूप लावण्याची वेळ संस्थाचालकांवर येते. संस्थेच्या परिसरात आणि बाहेर तुम्हाला ट्रॅक्टरच्या भल्यामोठ्या रांगा पाहायला मिळतात. एवढेच नाही तर परिसरात सर्वत्र शेतकऱ्यांची धान आणि धानाची पोती पाहायला मिळतात. मात्र, ज्या अपेक्षेने हे शेतकरी इथे येतात प्रत्यक्षात इथे आल्यावर त्यांच्या अपेक्षांचा अक्षरशः चुराडा होतो.
हेही वाचा - चारा टंचाईवर मात करण्यासाठी 18 वाणांचे गवत उपलब्ध; पशुवैद्यकीय विभागाचा अभिनव उपक्रम
इथे आल्यानंतर या शेतकऱ्यांचे पंधरा ते वीस दिवस धान मोजणी होत नाही. याउलट प्राधान्याने व्यापाऱ्यांच्या धानाची मोजणी होते. जेव्हा या शेतकऱ्यांच्या धानाचे मोजणी केली जाते, तेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आणि तेथून तिसऱ्या ठिकाणी धानाच्या पोत्यांची उचल होते. त्यासाठी त्यांना एका पोत्यामागे जवळपास 25 रुपये खर्च येतो. त्यानंतर 40 किलोच्या एका पोत्यावर 1 ते दीड किलो जास्त धान मोजले जाते. सात दिवसात मिळणारे पैसे महिना-दीड महिने मिळत नाही. या सर्व लुटीमुळे बोनसच्या नावाने मिळणारा अधिकचा नफा हा सर्व केंद्रावरील हमाल कर्मचारी आणि संस्थाचालक लुटून घेतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केवला आहे.
हेही वाचा - नाना पटोलेंचे सुकडीमध्ये जंगी स्वागत, ग्रामस्थांनी काढली भव्य मिरवणूक
याविषयी केंद्र चालकांना विचारले असता त्यांनी अशा गोष्टी आमच्याकडे होत नसल्याचे सांगितले. सर्वच गोष्टी नियमानुसार करतो शेतकऱ्यांची अजिबात लूट होत नाही, असे धान खरेदी केंद्राच्या सचिवाने सांगितला.
हेही वाचा - उशीर झाला म्हणून कर्तव्यावर न घेतल्याने एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न