भंडारा - जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याच्या लोहारा गावातील एका शेतकऱ्याचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कालव्यात पाय धुवायला गेल्यावर तोल गेल्याने शेतकऱ्याला जीव गमवावा लागला. ज्ञानेश्वर पिंगरे (वय-56) शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या रोवणीचा हंगाम सुरू असून शेतकरी शेतात शक्य तेवढ्या लवकर रोवणी आटोपण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच ही घटना घडली.
लोहारा येथे राहणारे ज्ञानेश्वर पिंगरे याची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. पेंच प्रकल्पाच्या कालव्याच्या शेजारी त्यांची शेती असल्याने त्यांनी सुद्धा रोवणी सुरू केली होती. दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळी याच पेंच प्रकल्पाच्या कालव्यात नेहमीप्रमाणे चिखलाने भरलेले पाय धुण्यासाठी गेले. मात्र, पाय धुताना पाय घसरून पाण्यात तोल गेल्याने आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ज्ञानेश्वर त्या प्रवाहात वाहत गेले. ते कालव्यात पडल्याचे समजतात शेतावर उपस्थित शेतमजूर आणि इतर लोकं यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, ते कुठेही आढळले नाहीत. शेवटी घटनास्थळाहून 500 मीटर अंतरावर ज्ञानेश्वरांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. ज्ञानेश्वर हे एक कष्टाळू शेतकरी होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांच्यामागे पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे.