भंडारा - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाला. तेव्हा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आग लगेच विझविण्यात आली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, हा ऑक्सिजनचा पुरवठा कोरोना सेंटरमध्ये केला जात होता.
भंडारा जिल्ह्यात वाढती कोरोना संख्या लक्षात घेऊन कोरोना वार्ड वाढविण्यात आले आहेत. अशाच एका वार्डासमोर शुक्रवारी रात्रीला ऑक्सीजन सिलिंडर लावण्यात आले होते. जवळपास सहा सिलिंडर एका लाईन लावले असता, यातील एका सिलिंडरच्या पाईप लाईन मधून गळती होऊन आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच वार्डातील सुरक्षारक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून लगेच आगीवर नियंत्रण मिळविले. कोरोना वार्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांना इतर ठिकाणी हलवून त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.
आठ जानेवारीच्या मध्यरात्री याच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नवजात बालकांच्या केअर युनिटमध्ये आग लागून दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निलंबनानंतर रियाज फारूकी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यानंतर या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल झाले. फारुकी हे कधीही तपासणीवर येतात. त्यामुळे आता या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोणताही कर्मचारी रात्री दरम्यान आपल्या कामापासून दुर्लक्ष करत नाही आणि त्याचाच प्रत्यय आज आला. घटनेच्या वेळेस खुद्द जिल्हा शल्य चिकित्सक हे राऊंड वरच होते. त्यामुळे आज कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मुंबई प्रमाणे मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा - 'ते ट्विट करून कोणाचे प्रवक्ते आहेत हे संजय राऊतांनी सिद्ध केले'
हेही वाचा - होळीच्या सणात महत्व असलेल्या गाठीवर कोरोनाचे सावट; गाठीला मागणी नसल्याने उत्पन्न नाही