भंडारा - शहराला लागून असलेल्या वैनगंगा नदीवर इ-कार्निया वनस्पतीचे साम्राज्य वाढत आहे. या वनस्पतीमुळे नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नागरिकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे ही वनस्पती लवकरात लवकर काढावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
भंडारा शहराला लागून वैनगंगा नदी वाहते. वैनगंगा नदी भंडारा शहरासाठी जीवनदायी आहे. या नदीतूनच शहराला पाणीपुरवठा होतो. या नदीवरच गोसे धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. धरणाची निर्मिती झाल्यापासून नदीत धरणाचे बॅक वॉटर बाराही महिने उपलब्ध असते. त्यामुळे भर उन्हाळ्यातही नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र, या नदीवर आता पुन्हा इ कार्निया वनस्पती वाढत आहे.
इकार्निया या वनस्पतीची वाढ पाण्यावर होते. ती पाण्याच्या वर असल्यामुळे सतत हवेमुळे तरंगत वेगळ्या दिशेने वाहत जाते. या वनस्पतीची वाढ मोठ्या झपाट्याने होते. त्यामुळे सुरुवातीला एकदोन ठिकाणी दिसणारी ही वनस्पती खूप कमी वेळात संपूर्ण नदीवर आच्छादन निर्माण करते. आज ही वनस्पती गोसे धरणापासून ते भंडारा शहराच्या टोकापर्यंत पोहोचली आहे. मोठ्या प्रमाणात ही वनस्पती या नदीच्या पाण्यावर तरंगत आहे. त्यामुळे दुरून बघितल्यास ही नदी एक हिरवेगार मैदान दिसते.
या वनस्पतीमुळे सूर्यप्रकाश पाण्याच्या पृष्ठ भागावर पोहोचतच नाही. त्यामुळे अतिशय दुर्गंधीयुक्त नदीचे पाणी झाले आहे. सूर्यप्रकाश पाण्याच्या आतमध्ये जात नसल्यामुळे पाण्यातील जीव जंतूंसाठी ही वनस्पती घातक ठरत आहे. विशेष म्हणजे माश्यांच्या वाढीत यामुळे घट होत आहे. या वनस्पतीमुळे नदीत सराव करणाऱ्या लोकांनाही याचा फटका बसत आहे. ही वाढत चाललेली वनस्पती नष्ट करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.
वनस्पती दोन वर्षांपूर्वी अश्याच पद्धतीने वाढत गेली होती. सुरुवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने काही महिन्यातच संपूर्ण नदी हिच्या विळख्यात आली होती. शासनाने या वनस्पतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी या वनस्पतींवर औषधांची फवारणी केली होती. त्यामुळे नदी या वनस्पतीपासून वाचवण्यात आली होती. आता पुन्हा या वनस्पतीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने लवकरात लवकर उपयायोजना करून पाण्याचे होणारे प्रदूषण थांबवावे, अशी मागणी गावकरी करत आहेत.