भंडारा - पुरुषाला दारूचे व्यसन जडल्याचे ऐकले असेल, काही प्रसंगी महिलांनीही दारू पिऊन रोडवर धिंगाणा घातल्याचे समोर आले. मात्र कोबडयांला दारुचे व्यसन लागल्याचे कधीच ऐकले नसेल. भंडारा जिल्ह्यात असा एक कोंबडा आहे, ज्याला रोज दारू लागते. एवढेच काय तर दारू न मिळाल्यास तो अन्नपाणी त्यागतो. विशेष म्हणजे कोंबड्याचा मालक हा निर्व्यसनी आहे. मात्र तरीही कोंबडा अट्टल दारुडा झालाच कसा असा प्रश्न तुम्हला पडला असेल. तर त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला या खास रिपोर्टमधून देणार आहोत.
शेतकऱ्याचा आवडता आहे कोंबडा - भंडारा शहरानजीक असलेल्या पिपरी पुनर्वसन गावातील रहिवासी भाऊ कातोरे हे पेशाने शेतकरी आहेत. भाऊ कातोरे यांना कुक्कुटपालन करण्याचा छंद जडला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रजातीचे कोंबडे त्यांनी पाळले आहेत. त्यातच एक कोंबडा त्याच्या कुटुंबातील सर्वांचा आवडता झाला. मात्र याच आपल्या आवडत्या कोंबडयाच्या एका वाईट सवयीमुळे भाऊ आणि त्यांचे कुटुंब चिंतेत आहे. या कोंबड्याला मागील काही महिन्यापासून दारूची सवय लागली आहे. एवढेच नाही तर दारू घेतल्याशिवाय तो पाणी घेत नाही, किंवा अन्नही खात नाही. जर तो पाणी घेणार नाही आणि अन्न खाणार नाही, तर तो मरेल आणि म्हणून त्याला वाचविण्यासाठी भाऊ कातोरे स्वतः कधी दारूच्या दुकानात गेला नाही तो दररोज या कोंबड्यासाठी दारू दुकानातून दारू आणून नाईलाजास्तव कोंबडयाला पाजतो आहे.
औषध म्हणून सुरू केली दारू आता लागले व्यसन - मागील वर्षी कोंबड्यावर "मरी" रोग आला होता. आपल्या प्रिय कोबडयांला मरीरोग जडल्याने कोंबड्याने खाणेपिणे सोडले होते. मोहफुलाची दारू या कोंबडयाला दिल्यास तो बरा होईल, गावातील एका व्यक्तीने यावर भन्नाट उपाय सूचवला. असे सूचवताच आपल्या लाडक्या कोंबड्याला मरी रोगापासून वाचवण्यासाठी भाऊ यांनी काही महिने मोहफूलाची देशी दारू कोंबड्याला पाजली.
मोहफुलानंतर सुरू केली विदेशीची मात्रा - मात्र मोहफुलाची दारू मिळेनासी झाल्यावर त्यांनी विदेशीचा उतारा देणे सुरु केले. या रोगातून तो बरा तर झाला, मात्र सततच्या दारू सेवनाने त्यांच्या कोबडयाला दारुचे व्यसन जडले असून दारू पिल्याशिवाय तो पाणी प्यायलाही तयार होत नाही. आता निर्व्यसनी मालकही आपल्या प्रिय कोंबड्याला वाचवण्यासाठी त्याचे व्यसन चालवतो. कोंबड्याला रोज दारू लागत असल्याने महिन्याला मालकाला 2 हजार रूपयांचा फटका बसत असून सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी दारू लपवून आणण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे चिंतेत पडलेल्या मालकाने आपल्या प्रिय कोंबड्याचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाण्यात पायपीट सुरु आहे.
दारू पिणारा हा पहिलाच कोंबडा - याबाबत पशू वैद्यकीय अधिकारी यांना विचारले असता दारू पिणारा कोंबडा हे मी पहिल्यांदाच ऐकत असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यात थोड्या प्रमाणात दारू घेत असल्याने कोंबड्याला काही होणार नाही, उलट या दारूमुळे त्याच्या पोटातील किटाणू मरू शकतात. मात्र जर दारू सोडवायची असेल तर दारूचा वास येत असलेल्या एखाद्या व्हिटॅमिनची औषध देणे सुरू करावे आणि हळूहळू त्याचे प्रमाण कमी केल्यास कोंबड्याची दारू सुटू शकते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.