भंडारा - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४१ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रविवारी पुन्हा ६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आता केवळ १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आज एकही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही.
१४ मे नंतर जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होण्यास सुरुवात झाली होती. तोपर्यंत जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र त्यानंतर ही संख्या वाढून ४१ पर्यंत गेली. हे सर्व बाहेर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून आलेले नागरिक होते. ४१ पैकी केवळ चार रुग्ण हे शहरातील होते. तर उर्वरित सर्व रुग्ण ग्रामीण भागातील होते. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक तीव्रतेने वाढेल, अशी शक्यता असताना मागील दोन दिवसात एकही रुग्ण न आढळल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. त्यातच मागील ६ दिवसात २४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने भंडारा हळूहळू कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात, अशा रुग्णांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे.
आतापर्यंत २,३८५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ४१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर २,१९८ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १४६ नमुन्यांचा प्राप्त व्हायचा आहे. आज ७ जून रोजी आयसोलेशन २३ व्यक्ती वार्डमध्ये भरती असून आतापर्यंत ३५४ व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे ३१७ रुग्ण भरती आहेत. १,७३६ व्यक्तींना संस्थागत विलगीकरणातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून ४०,६९६ व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून २९,४३३ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या ११,२६३ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी २८ दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये, अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.