भंडारा - कोरोनाबाधित व्यक्तीशी संबधित संभाव्य व्यक्तींच्या नावाची गोपनीय यादी (ट्रेसिंग लिस्ट) सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. याप्रकरणी महिला आरोग्य सहाय्यकासह तिच्या मुलावर भंडारा पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय यादी प्रसिद्ध केल्यामुळे या यादीमध्ये नाव असलेल्या लोकांना मागील 2 दिवसांपासून मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
भंडाऱ्यामध्ये 27 एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. या रुग्णाला नेमका कोणापासून कोरोना झाला, याचा शोध घेण्यासाठी संपर्कातील व्यक्तींची प्रशासनाने यादी तयार केली होती. ही गोपनीय यादी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या ग्रुपवर टाकली. या ग्रुपमध्ये ही महिला आरोग्य सहाय्यक होती. या यादीतील संबंधित लोकांना शोधून काढून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही यादी ग्रुपवर टाकण्यात आली होती. मात्र, 29 एप्रिलला प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सहाय्यक महिलेने आपल्या मुलाला व्हाट्सअपवर फॉरवर्ड केली. त्यावेळी तिच्या मुलाने ती शक्य तेवढ्या त्याच्या संबंधित लोकांना फॉरवर्ड केली.
ही यादी कोरोनाबाधित लोकांची यादी आहे, असे टाकून संपूर्ण जिल्ह्यात अतिशय वेगाने पसरली. आरोग्य विभागाचे कर्मचारी या यादीतील व्यक्तींच्या घरी पोहोचण्याअगोदरच आणि त्यांना होम क्वारंटाईन करण्यापुर्वीच नागरिकांचे या यादीतील लोकांना फोन येणे सुरू झाले. त्यामुळे या सर्व लोकांना मागील 2 दिवसांपासून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच या यादीमुळे भंडाऱ्यामध्ये आणखी 100 ते 150 नवीन रुग्ण मिळाल्याच्या चर्चेला उधान आले होते. माध्यमांनी हा गंभीर विषय लावून धरल्याने प्रशासन जाग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ही आरोग्य सहाय्यक महिला आणि तिच्या मुलाविरुद्ध रीतसर तक्रार भंडारा पोलीस ठाण्यात दाखल केली असून या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.