भंडारा - शरद पवार(NCP Chief Sharad Pawar) यांच्यासारखे नेते केव्हाचे काँग्रेस(Congress) सोडून गेलेत. आता काँग्रेस केवळ कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला आहे. काँग्रेस पक्षातील निर्णय हायकमांड घेतात. मात्र, आमच्या घरात काय सुरूये हे आम्हालाच माहिती आहे. दुसऱ्यांना हे कसे कळणार. त्यामुळे शरद पवारांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress State President Nana Patole) यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाचे निर्णय सोनिया गांधी(Sonia Gandhi) घेतात असे वक्तव्य गुरुवारच्या एका सभेत शरद पवार यांनी केले होते.
- निवडणुकांमुळेच तीन कृषी कायदे मागे घेतले - नाना पटोले
मोदी सरकारने 5 राज्यात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन तीन कृषी कायदे मागे(Krishi Kanoon Repeal) घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हे खोटे बोलणारे आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचा नाही तर येणाऱ्या निवडणुकींचा विचार केला आहे, असे मत नाना पटोले यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यावर व्यक्त केले आहे.
- शरद पवारांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही - पटोले
तिकीट वाटप करताना निवडणुकीत आणि सरकार चालवण्यासाठी आम्ही त्याग केला. मात्र, आम्ही वारंवार त्याग करणार नाही आणि व्याजासकट त्या त्यागाची किंमत वसूल करू, असे शरद पवार यांनी चंद्रपूर येथे जाहीर सभेत बोलले होते. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. त्याग कोणी केला आहे हे जनतेला माहिती आहे. आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे म्हणत नाना पटोले यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले. तसेच आपण शरद पवारांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचेही पटोले म्हणाले.
- सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी-
राष्ट्रपती पदाची निवडणूक लक्षात घेता आमदार कमी न होण्यासाठी मोदी सरकारने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 5 राज्यात येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फटका या निवडणुकीत पडू शकतो. आमदार कमी झाले त्याचा प्रभाव राष्ट्रपती निवडणुकीत होईल याची जाणीव झाल्यानेच नरेंद्र मोदींनी कृषी कायदे परत घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र, जो पर्यंत कायदे मागे घेतले जाणार नाहीत, तो पर्यंत हे कायदे मागे घेतले गेले आहेत असे म्हणता येणार नाही. कारण हे खोटारड्यांचे शासन आहे. या आंदोलनात हजारों शेतकरी शहीद झाले. मोदी सरकारने शेतकऱ्यांची आता माफी मागावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
ज्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवून हत्या केली, ते मंत्री अजूनही मंत्रीपदावर कायम आहेत. मग अशा शासनावर विश्वास कसा करावा की हे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतात. भविष्यात असे कायदे लागू करणार नाही असा विश्वास मोदी सरकारने शेतकऱ्यांना द्यावा, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.