भंडारा - नगर परिषदेमध्ये सफाई विभागात कार्यरत एक कर्मचारी काल रात्रीपासून बेपत्ता आहे. त्याची दुचाकी आणि चप्पल ही वैनगंगा नदीच्या लहान पुलावर सापडल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. सकाळपासूनच स्थानिकांच्या मदतीने नदीमध्ये त्यांचा शोध काम सुरू आहे. बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी सकाळपासूनच या कर्मचाऱ्याला शोधत आहेत. मात्र, मुख्याधिकारी यांनी एकदाही घटनास्थळी येऊन न बघितल्याने पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी कक्षात जाऊन घेराव केल्यानंतर शोध कार्यासाठी बोट उपलब्ध करून दिल्या गेली. स्वतः मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष हे घटनास्थळी पोहोचले.
सागर कटकवार हा भंडारा नगर पालिकेमध्ये सफाई विभागात कार्यरत आहे. सध्या वार्ड क्र. 12 आणि 13 मध्ये सफाई मुकादम म्हणून काम पाहत होता. बुधवारी रात्री 9च्या सुमारास घरून निघाला तो घरी परतलाच नाही. सकाळी त्याची शोधाशोध केली असता त्याची दुचाकी आणि चप्पल वैनगंगा नदीच्या लहान पुलावर मिळाली. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तेव्हापासून त्या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांचा पोलीस स्थानिकांच्या मदतीने शोध घेत आहेत. मात्र, मुख्याधिकारी यांनी एकदाही घटनास्थळी येऊन पाहणी केली नाही म्हणून, काही संतप्त सफाई कर्मचारी यांनी मुख्याधिकारी यांच्या कक्षात जाऊन घेराव केल्यानंतर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शोध कार्यासाठी बोट देण्यात आली. सध्या शोध मोहिम सुरू आहे.
कोविड 19 मध्ये आम्ही जीवाची बाजी लावून काम करतो आणि मुख्याधिकारी वातानुकूलित कक्षात बसून आदेश करतात. मात्र, आज आमच्यापैकी व्यक्ती बेपत्ता आहे तरीही मुख्याधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही असा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.