भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पूणेच्या वतीने आज दहावीचा निकाल घोषित करण्यात आला. नागपूर विभागात भंडारा जिल्हा 94.41 टक्के गुण मिळवित तिसरा ठरला आहे. बारावीप्रमाणे यावेळीही निकालाच्या टक्केवारीत मुलींनी बाजी मारली आहे. नुतन कन्या शाळेची ॠतुजा वाघाये ही 98.40 टक्के गुण घेत जिल्ह्यात पहिली आली आहे. तर, पवनी येथील वैनगंगा विद्यालयाची आयुषी घावळे व लाखनी येथील समर्थ विद्यालयाची किर्ती किशोर वाघाये यांनी 98.20 टक्के गुण घेत जिल्ह्यात संयुक्तरित्या दुसऱ्या आल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यातील 285 शाळांमधील 17 हजार 644 विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली. यापैकी 17 हजार 560 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आणि 16 हजार 578 विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. निकालाची टक्केवारी 94.41 एवढी आहे. प्राविण्य श्रेणीत 4 हजार 618, प्रथम श्रेणीत 7 हजार 57, द्वितीय श्रेणीत 4 हजार 38 व उत्तीर्ण श्रेणीत 865 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांची संख्या 8 हजार 344 म्हणजे 92.41 तर मुलींची संख्या 8 हजार 234 म्हणजे 96.52 टक्के ऐवढी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुलींनी जिल्ह्यात बाजी मारल्याचे स्पष्ट आहे.
तालुकानिहाय विचार करता, भंडारा तालुका 94.99, पवनी 92.81, तुमसर 93.59, लाखांदूर 95.59, साकोली 94.67, मोहाडी 93.72 व लाखनी तालुक्याचा 96.05 टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातील 66 शाळांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. मिशन हायस्कूल भंडारा, जि.प.हायस्कूल डोंगरगाव, ऑर्डनन्स फॅक्टरी स्कूल, जेसीस कॉन्व्हेंट, मानवता हायस्कूल, जिजामाता माध्यमिक विद्यालय, महिला समाज विद्यालय भंडारा, अंकूर विद्या मंदीर भंडारा, प्राईड कॉन्व्हेंट, माईण्डस आय स्कूल भंडारा, विद्या विहार मंदिर लाखांदूर, पवन पब्लीक स्कूल पवनी, पवन विद्यालय पवनी यासह जिल्हयातील काही जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांचा 100 टक्के निकाल देणाऱ्या शाळांमध्ये समावेश आहे.
भंडारा येथील नूतन कन्या शाळेतील ॠतुजा वाघाये हिला 500 पैकी 492 म्हणजेच 98.40 टक्के गुण मिळाले आहेत. खेळाच्या गुणांचा समावेश केल्यास तिची टक्केवारी 100 वर जाते. खेळाचे गुण वगळता ॠतूजाला मिळालेल्या गुणांच्या आधारे ती भंडारा जिल्ह्यात पहिली ठरली आहे. तर पवनी येथील वैनगंगा विद्यालयाची आयुषी सुनील घावळे व लाखनी येथील समर्थ विद्यालयाची किर्ती किशोर वाघाये यांनी 500 पैकी 491 गुण मिळाल्याने 98.20 टक्के गुण घेत संयुक्तरित्या जिल्ह्यात दूसरा क्रमांक पटकाविला आहे. ऋतुजा वाघाये ही राज्यस्तरीय हँडबॉल खेळाडू आहे, खेळ आणि अभ्यास या दोन्हीची सांगड घालत दिवसातून 8 ते 10 तास अभ्यास करून तिने हे यश मिळविले आहे.
आपल्या श्रेयाबद्दल बोलताना ऋतुजा म्हणाली, माझ्या यशाचे श्रेय माझ्या आई वडिलांना आणि गुरुजनांना देते. विशेष म्हणजे माझ्या आजोबांची शेवटची इच्छा होती की मी जिल्ह्यात पहिली यावी. त्यांची आज इच्छा पूर्ण केल्याचा मला आनंद आहे असे तिने सांगितले. भविष्यात ऋतुजाला डॉक्टर व्हायचे आहे. ती जिल्ह्यत पहिली आल्यानंतर शाळेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला.