भंडारा - जिल्हा परिषदेचे प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप वाघाये यांना चार हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. विशेष म्हणजे 57 वर्षीय वाघाये हे पुढच्या काहीच महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते.
मागच्या आठवड्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचारी हा कोरोनाबाधित निघाल्यामुळे चर्चेत आली होती त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रविवार पर्यंत जिल्हा परिषदेचे कामकाज पूर्णपणे बंद ठेवले होते.
प्रभारी शिक्षणाधिकारी दिलीप वाघाये यांनी या पदावर पोहोचल्यानंतर भ्रष्टाचार सुरु केला. प्रत्येक कामासाठी पैसे घेण्याच्या त्यांच्या प्रकाराने सर्वच त्रस्त होते. अशाच एक त्रस्त व्यक्तीने त्यांची तक्रार भंडारा लाचलुचपत विभागात केली. तक्रारकर्ता लाखनी तालुक्यातील शिक्षणसंस्थेचा संस्थापक आहेत. त्यांच्या पाच शाळा, दोन ज्युनियर कॉलेज, दोन वसतिगृह, दोन आश्रम शाळा आहेत.
शिक्षणाधिकारी वाघाये यांनी 26 जूनला एक पत्र काढून आदिवासी शिव विद्यालय, राजेगाव येथील मुख्याध्यापक यांच्या सेवानिवृत्तीचे पत्र दिले. या पत्रानुसार भारतीय आदिवासी शिव शिक्षण संस्था, गरडा येथे सचिव हे पद नाही. तसेच संस्थेमध्ये कु. जयश्री मरस्कोल्हे या कोणत्याही पदावर नाहीत असे नमूद करण्यात आले होते. त्या पत्रात नमूद असलेल्या गोष्टी या चुकीच्या असून ते पत्र रद्द करावे यासाठी तक्रारदार शिक्षणाधिकारी वाघाये यांना भेटले असता पत्र रद्द करण्याच्या मोबदल्यात त्यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
केवळ पैशाच्या पोटी चुकीचे पत्र लिहून पैशाची मागणी करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्या विरुद्ध तक्रारदाराने भंडारा लाचलुचपत विभागामध्ये तक्रार नोंदवली. सुरुवातीला पाच हजार रुपये मागणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांनी तडजोडीनंतर चार हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली.
भंडारा लाचलुचपत विभागाने सापळा रचून शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्याच कक्षामध्ये पंचासमोर चार हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करून त्यांच्यावर भंडारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवला असून त्यांच्या घराची झडती सुरू केली.