भंडारा - वैनगंगा नदीवर इकॉर्निया या जलपर्णीने सर्वत्र स्वतःचे जाळे पसरविले होते. नदीच्या मोठ्या भागात ही वनस्पती पसरल्याने नदीचे पाणी दिसतही नव्हते. ही वनस्पती पाण्यावर तरंगत असल्यामुळे पाण्याखाली जगणारे मासे यांना अन्नद्रव्य तसेच सूर्यप्रकाश मिळत नव्हता. त्यामुळेच, पाण्याला दुर्गंधीदेखील येत होती.
ही वनस्पती हटवण्याची मागणी मागील कित्येक महिन्यांपासून होत असूनही, त्याकडे प्रशासन अजिबात गांभीर्याने लक्ष देत नव्हते. मात्र, पालकमंत्री परिणय फुके यांनी ही बाब गांभीर्याने घेत वैनगंगा नदी स्वच्छ करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.
या वनस्पतीचे समूळ उच्चाटन करण्याकरिता भाडेतत्वावर मशीन लावून नदी स्वच्छ करण्याकरिता दोन कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. वैनगंगा नदी त्वरित स्वच्छ करता यावी यासाठी शीघ्र निधीची तरतूद करून कार्य सुरु करावे, अशा आदेश पालकमंत्र्यांनी दिला आहे. या वनस्पतीचा समूळ नायनाट झाल्यास, वैनगंगा नक्कीच मोकळा श्वास घेईल.