भंडारा - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गुरुवारपासून कलम 144 म्हणजे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. तसेच, वाईन शॉपी, बियर बार, रस्त्यावरील पानटपऱ्या रस्त्यावरील खाण्याचे स्टॉल यांच्यावरही 31 मार्चपर्यंत बंदी घातली गेली आहे. मात्र, बंदीचा आदेश येताच दिवसभर तळीरामांची वाईन शॉपवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निघाले. हे आदेश संबंधित दुकानांच्या मालकापर्यंत पोहोचविले. वाईन शॉपच्या मालकांनी त्यांच्या दुकानासमोर सायंकाळी पाचनंतर 31 मार्चपर्यंत दुकान बंद राहण्याचा बोर्ड लावताच ही बातमी लोकांपर्यंत वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांची दारूखरेदीसाठी एकच झुंबड उडाली. कोणी पिशवीत तर, कोणी गाडीच्या सीट खाली तर कोणी बॅगमध्ये जमेल तेवढ्या बॉटल्स घेऊन गेले.
कोरोनाच्या भीतीमुळे काही लोकांनी तोंडाला माक्स बांधले. मात्र, जीव मुठीत घेऊन दारूसाठी या गर्दीत पोहचले. कुणी मोठी पिशवी घेऊन आले. तर, कोणी मोठी एअरबॅग घेऊन आलेत. पिशवीत आणि बॅगमध्ये मावतील तेवढ्या बॉटल्स कोंबून पुढच्या पंधरा दिवसांची यांनी व्यवस्था केली. काही महाशयांना माहीत होताच गाडी सरळ वाईन शॉपच्या दिशेने वळवली आणि गाडीच्या डिक्कीत जमतील तेवढे दारूचे बंपर भरून नेले. सायंकाळचे साडेपाच वाजले. मात्र, या तळीरामांची गर्दी काही केल्या कमी होत नव्हती. शेवटी माध्यमांचा कॅमेरा बघताच दुकानदाराने लगबगीने दुकान बंद केले.
16 मार्चपासून भंडारा जिल्हाधिकारी यांनी टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या गोष्टींवर बंदीचे आदेश काढले. गुरुवारी एक आदेश काढून जिल्ह्यातील सर्व बिअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अँड रेस्टॉरंट, सर्व देशी दारूचे दुकाने, सर्व क्लब पान व खर्रा ठेले तसेच रस्त्यावरील सर्व खाद्यपदार्थांच्या टपऱ्या यांच्यावर सायंकाळी पाच वाजेपासून 31 मार्चपर्यंत बंदी घातली गेली.
तसेच, जिल्ह्यातील सर्व वातानुकूलित शासकीय आणि खाजगी बसेस तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सर्व बसेसच्या निर्जंतुकीकरणासंदर्भात कार्यवाही तत्काळ व नियमित स्वरुपात करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले.
सायंकाळी पाचनंतर पोलीस विभागाच्या टीम गाड्यांमधून लोकांना नियमाचे पालन करण्यासाठी ज्या दुकानांवर बंदी आहे ते दुकान बंद करण्यासाठी आव्हान करण्यात आले. तसेच, जमाबंदी असल्याने लोकांनी एका ठिकाणी जमा होऊ नये, असे आव्हान यावेळी पोलिसांनी केले. आदेशाचे पालन न करणाऱ्या लोकांवर कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांतर्फे नागरिकांना वारंवार केले जात होते.
हेही वाचा - ठाण्यात दुचाकी शोरूमसह गॅरेज चालकांवर कारवाई; ५० दुचाकी जप्त
हेही वाचा - कोरोना प्रभाव : मध्य रेल्वेने केल्या 23 गाड्या रद्द