बीड - परळीचा 'वैद्यनाथ महाशिवरात्र महोत्सव' राज्यात प्रसिध्द आहे. या उत्सवात विभाग स्तरावरील पशु प्रदर्शन दरवर्षी भरत असते. पुढच्या वर्षीपासून महाशिवरात्रीला राज्यस्तरीय पशू प्रदर्शन आणि कृषी प्रदर्शन आयोजित करण्याचे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. परळी पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाथ प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित केलेल्या विभागस्तरीय पशू प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
पूर्वीच्या काळी लोक बैलगाडीने शिवरात्रीच्या वेळी परळीला येत असत. काळानुरूप यात्रेचे स्वरूप बदलत गेले. आता ही यात्रा आणखी भव्य व्हावी, अशी परळीकरांची इच्छा आहे. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल, असे मुंडे म्हणाले. या पशू प्रदर्शनाला आणि महाशिवरात्री महोत्सवाला आणखी भव्य स्वरूप देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत 50 लाख रूपये निधीची विशेष तरतूद करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - सीएएला घाबरण्याची काहीही गरज नाही, मुख्यमंत्री ठाकरेंचे मोदी भेटीनंतर स्पष्टीकरण
या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध जातींच्या गाई, बैल, घोडे, श्वान (कुत्रा) या पशुंना घेऊन शेतकरी, पशू पालक उपस्थित होते. यावेळी उपस्थित पशु पालकांना पशूंच्या प्रजातीनुसार 11 हजार, 7 हजार व 5 हजार अशी उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, आमदार संजय दौंड, पशुसंवर्धन समिती सभापती सविता मस्के, समाजकल्याण सभापती कल्याण आबुज, माजी आमदार पृथ्वीराज साठे, पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते, सभापती गणेश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अॅड. गोविंदराव फड, उपजिल्हाधिकारी महाडीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भंडारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पालवे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनावरे सांभाळायला नाद पाहिजे -
आजकाल कमी कष्टामध्ये जास्त मोबदला मिळावा असे प्रत्येकाला वाटते. मात्र, कोणत्याही कामात मेहनती शिवाय फळ नाही. जनावरे सांभाळणे, अशा प्रदर्शनांमधून पहिल्या क्रमांकाचे बक्षिस पटकावणे यासाठी जनावरे सांभाळण्याचा नाद पाहिजे, असे धनंजय मुंडे म्हणाले. परळी येथील पशू वैद्यकीय दवाखान्याचे रूप येत्या वर्षभरात आपण बदलू. नव्या रूपात आणि अधिक सोयी-सुविधांनी युक्त दवाखाना येत्या वर्षभरात सुरू करू, असेही मुंडे यांनी यावेळी परळी तालुक्यातील 54 महिला बचतगटांना मंजूर झालेल्या 59 लाख रुपयांच्या निधीपैकी 16 बचत गटांना प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या निधीचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.