बीड - शेतात पेरणी करत असताना एका महिलेवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना वडवणी तालुक्यातील मोरेवाडी येथे घडली. कपाशीची लागवड करत असताना रानडुकराने या महिलेवर अचानकपणे हल्ला केला. सारीका राजेश आगलावे (वय-३५ वर्ष) असे या महिलेचे नाव आहे. त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
रानडुकराने चावा घेतल्याने सारीका यांच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. त्या शेतात कपाशीची लागवड करत होत्या. अचानक रानडुकराने मागून येऊन हल्ला करत पायाचा चावा घेतला. जखमी अवस्थेत त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. आठ दिवसांपासून रानडुकराने चावा घेण्याच्या घटना या भागात सातत्याने घडत आहेत.
या हल्ल्यामुळे शेतात काम करणार्या शेतकरी आणि मजुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशा रानडुकरांचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.