बीड - जिल्ह्यातील धारुरमध्ये शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बोडखा येथील महादेव वस्ती येथील शेतात काम करत असताना शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला चढवत गंभीर जखमी केले. ही घटना आज सकाळी 7 च्या सुमारास घडली. श्रीकृष्ण (बंडू) धोंडीबा तिडके (वय -38) असे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी 7 च्या दरम्यान महादेव वस्ती येथील शेतात बंडू हे आपले काम करत होते. त्यावेळी अचानक रानडुकराने हल्ला चढवत बंडू यांना गंभीर जखमी केले. रानडुकराने त्यांच्या पोटावर व इतर ठिकाणी चावा घेतला आहे. या शेतकऱ्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना धारूर ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता, गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई ग्रामीण रुग्णालय येथे 'रेफर' करण्यात आले आहे.
या रानडुकरांच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रानडुकरांचा वनविभागाकडून बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी धारूर तालुक्यातील शेतकरी यांनी केली आहे. दरम्यान, यापुर्वीही भोगलवाडी येथे दोन वेळा शेतकऱ्यांवर रानडुक्करांनी हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.