परळी - सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडेकोट प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातही कोरोना रुग्ण वाढत असल्याने विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दगडवाडी येथील जिल्हा चेकपोस्टवर पोलिसांकडुन वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
या तपासणी दरम्यान जिल्ह्यात विनाकारण प्रवेश करणाऱ्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे परळी- गंगाखेड रोडवर वाहनांची वर्दळ बंद होती.
परळी तालुक्यास परभणी व लातुर या दोन जिल्ह्याच्या सीमा असल्याने जिल्हा सीमेवर परळी प्रशासनाने नाकेबंदी करण्यासाठी चेक पोस्ट उभारले आहेत.
रविवारी दगडवाडी येथील चेकपोस्टवर पोलीस उपनिरीक्षक मरळ, अमोल मुंडे, अनंत भोसले, सुभाष कदम, दत्ता माने, विकास चौरे, ज्ञानेश्वर सोळंके, तसेच शिक्षक गटशिक्षणाधिकारी अन्सारी आदी कर्तव्य बजावत आहेत.
या ठिकाणी आलेल्या वाहनांची पास ऑनलाईन आहे का, प्रवासाचे कारण, प्रवाशांची संख्या तपासून याची रजिस्टर वर नोंद घेणे व विनाकारण येणाऱ्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे.