परळी (बीड)- जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीत मतदानावर बहिष्कार घालण्याच्या पंकजा मुंडे यांच्या आवाहनाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले. याचा प्रत्यय केज,आष्टी, पाटोदा, वडवणी येथे झालेल्या कमी मतदान वरुन लक्षात आले आहे. जिल्हयात ५७ टक्के तर परळीत केवळ ४७ टक्के अत्यल्प मतदान झाल्याने पालकमंत्र्यांना दणका बसल्याचे बोलल्या जात आहे.
जिल्हा बॅक निवडणूकीच्या आठ जागांसाठी शनिवार (आज) मतदान झाले. ही संपूर्ण प्रक्रियाच खोटी आणि लोकशाहीचा अवमान करणारी आहे. त्यामुळे या मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यांनी केलेल्या या आवाहनाचा परिणाम मतदानावर ठिक ठिकाणी झाल्याचे दिसून आले आहे. केज, आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी येथे अतिशय कमी मतदान झाले. तर अन्य ठिकाणीही मतदारांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे जिल्हयात ५७ टक्के इतकेच मतदान झाले.
हा झाला परिणाम
परळीत चांगले मतदान होईल अशी राष्ट्रवादीची आशा होती. मात्र पंकजा मुंडे यांच्या आवाहनामुळे ती फोल ठरली आहे. याठिकाणी फक्त ४७ टक्के मतदान झाले. अत्यल्प मतदानामुळे राष्ट्रवादीने नैराश्यातून बोगस मतदान तसेच मारामारी, गोंधळ करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा-'अब तो स्पष्ट है, ये सरकार भ्रष्ट है'