बीड - परळी विधानसभा मतदारसंघात कायम भाजपला व गोपीनाथ मुंडे परिवराला राजकीय विरोध करणा्रे काँग्रेसचे प्रा. टी. पी. मुंडे यांनी काँग्रेसशी बंडखोरी करत आज पंकजा मुंडे यांना पाठींबा दिला आहे. शनिवारी टी. पी. मुंडे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला स्वतः पंकजा मुंडे यांनी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांना मोठा दणका दिला आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या एक मोठ्या गटाने पंकजा मुंडे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. शनिवारी परळी येथे मेळावा घेऊन टी.पी. मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मेळाव्याला स्वतः पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यामध्ये काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी. पी. मुंडे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप मुंडे, परळी काँग्रेस तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व्यंकटी गित्ते यांच्यासह माजी नगरपालिका सभापती जयश्री गीते व विठ्ठल साखरे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. परळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असून धनंजय मुंडे हे उमेदवार आहेत. मात्र, आता याचा वचपा धनंजय मुंडे कसा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपमधून देखील एक मोठा गट राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. पुढील दोन दिवसात धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचेही काही संकेत मिळत आहेत.