बीड - कोविडच्या दुसऱ्या लाटे दरम्यान डॉक्टरांनी गोरगरीब रुग्णांकडून लाखो रुपयांची बिले उकळली आहेत. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने थातूरमातूर चोकशी करत डॉक्टरांना अभय दिल्याची अनेक प्रकरणे समोर आल्याचे सांगत, या प्रकरणाचे 'क्रॉस ऑडीट ' करा, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत मंगळवारी बाबुराव पोटभरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. याप्रसंगी बहुजन विकास मोर्चाचे पदाधिकारी प्रशांत ससाणे, सुमित डोगरे, श्रहरी मोरे, विनोद शिंदे, बाबासाहेब वाघमारे, जयदीप शिंदे, नवनाथ धाईजे आदींची उपस्थिती होती.
- दोषी आढळलेल्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा -
पत्रकार परिषदेत बोलताना पोटभरे म्हणाले की, कोविडच्या दुसऱ्या लाटे दरम्यान डॉक्टरांनी गोरगरीब रुग्णांकडून लाखो रुपयांचे बिले उकळले. कोविडच्या संकटात नागरिकांना कोणाकडे तक्रार करायची याचा प्रश्न पडला होता. याशिवाय ज्या नागरिकांनी डॉक्टरांच्या विरोधात तक्रारी केल्या त्यांची कसलीच चौकशी झालेली, अथवा कारवाई झालेली नसल्याचा आरोप पोटभरे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणात जे डॉक्टर चौकशीत दोषी आढळतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, शिवाय या चौकशीदरम्यान ज्या रुग्णांची आर्थिक फसवणूक झालेली आहे, त्यांचा देखील जवाब अथवा म्हणणे घ्यावे, अशी मागणी बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.
- बीडमध्ये भूमाफिया देखील मोकाट -
बीड जिल्ह्यातील शासनाच्या मालकीच्या अनेक जागा हडप करणारे मोठे रॅकेट सक्रिय आहे. यामध्ये प्रशासनातील अधिकारी यांना हाताशी धरून भूखंड लाटले जात आहेत. देवस्थानच्या जमिनी देखील बळकावल्या जात असून भूमाफियांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना मोकाट फिरू दिले जात असल्याचा आरोप पोटभरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. बहुजन विकास मोर्चाने केलेल्या मागण्या आठ दिवसात मान्य केल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - सरकार सणांच्या नाही, कोरोनाच्या विरोधात; मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले