बीड - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार -
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरूचे एक वेगळे स्थान असते. जीवनात प्रगती साधायची असेल तर गुरुच्या मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते. माझ्या आयुष्यातदेखील गुरु म्हणून माझ्यावर संस्कार करणारे माझे आई-वडील त्यांच्यानंतर समाज यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यानंतर मात्र, ज्या समाजासाठी मी काम करतो तो समाजच माझा गुरु आहे. कारण काम करत असताना समाजाकडून दररोज नवी गोष्ट शिकायला मिळते. म्हणून आई-वडिलांच्या नंतर मी समाजालाच माझा गुरु मानतो, अशी भावना बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केली.
आपल्या गुरु विषयी व्यक्त होताना ते म्हणाले, गुरु हा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. आपल्याकडे असलेल्या क्षमतेला योग्य आकार आणि योग्य मार्ग दाखवण्याचे काम गुरूच करत असतात. माझ्या आयुष्यातही गुरु म्हणून माझे आई-वडील यांचे महत्त्वाचे स्थान आहे. आज मी जे काही आहे ते माझ्या आई-वडिलांमुळे आहे. त्यांच्यानंतर मी जे काही चांगले शिकलो ते समाजाकडूनच शिकलो आहे. जिल्हाधिकारी म्हणून काम पाहताना योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी असते, अशा वेळी अगोदर समाजाचा विचार महत्वाचा असतो. ज्या समाजाकडे मी गुरु म्हणून पाहतो त्या समाजासाठी माझ्या हातून चांगली कामे व्हावेत हीच खरी गुरुदक्षिणा आहे, असेही ते म्हणाले.
पुढच्या काळात जिथे कुठे मी काम करेल, तिथे समाजासाठी चांगले करण्याचा प्रयत्न करेन. ही ऊर्जा मला समाजाकडूनच मिळते. यावेळी त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आई-वडिलांसह समाजालाही वंदन करत, त्यांचे आभार मानले.