बीड : बीडमध्ये हंगामी फवारणी अधिकारी प्रकरणांमध्ये विभागीय अधिकारी यांनी 69 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या 69 जणांची चौकशी चालू असतानाच हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत ( Health Minister Tanaji Sawant ) यांना एक पत्र लिहून ज्या अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र दिले आहेत त्या अधिकाऱ्यांचे निलंबन करू नका असे आशयाचे पत्र लिहिले. यावरून आरोग्यमंत्री तानाजी सावंतम यांनी यांच्यावर कार्यवाही करण्याची स्थगिती दिलेली आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची हकालपट्टी करा - बीडमध्ये हंगामी फवारणी अधिकारी प्रकरणांमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी या बोगस प्रमाणपत्राचे वाटप केले आहे त्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा व असे बोगस अधिकारी व बोगस अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी करत आज बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी धरणे आंदोलन केले आहे.
काय आहे प्रकरण - 2006 मध्ये फवारणी प्रमाणपत्र बंद असताना सुद्धा 2017 ते 2020 या कालावधीमध्ये 69 लोकांवर बोगस प्रमाणपत्र घेतले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. संबंधित प्रकरणांमध्ये जे तीन शासकीय अधिकारी आहेत, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा, असे शासनाने पत्र दिलेले आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना पत्र लिहिले की, संबंधितांवर या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात येऊ नये, यावरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी यांच्यावर कार्यवाही करण्याची स्थगिती दिलेली आहे.
50 खोके एकदम ओके आंदोलन - मध्यंतरीच्या कालावधीमध्ये संचालक उपसंचालक जिल्हा शल्य चिकित्सक अशा 22 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या, मात्र दोन दिवसात त्या बदल्या कॅन्सल करण्यात आल्या होत्या, नंतर पुन्हा त्यांना पदस्थापना देण्यात आली. याप्रकरणात नेमका काय घोटाळा आहे ? कोट्यावधी रुपयाच्या बोगस प्रमाणपत्रांमध्ये तानाजी सावंत यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण केली आहे. एक प्रकारे जनमानसामध्ये असलेली 50 खोके एकदम ओकेची भावना सरकारने सिद्ध करून दाखवली. भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट आरोग्यमंत्री आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला नको, एवढच नव्हे तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी आहे. म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 50 खोके आणि एकदम ओके असं आंदोलन करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी सांगितले.