बीड - वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बीड जिल्ह्यात शनिवार व रविवार हे दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यानुसार शनिवारी बीड शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व आस्थापना कडकडीत बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकाना मेडिकल खासगी दवाखाने खुले ठेवण्यात आले होते.
दिवसाकाठी 600 ते 800 पॉझिटिव्ह रुग्ण
बीड जिल्ह्यात सद्यस्थितीत पाच हजारहून अधिक सक्रिय कोरोना चे रुग्ण आहेत. तीस हजारांहून अधिक नागरिकांना आतापर्यंत कोरोना झालेला आहे. या सगळ्या परिस्थितीत दिवसाकाठी 600 ते 800 पॉझिटिव्ह रुग्ण बीड जिल्ह्यात आढळून येत आहेत वाढत्या कोरनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्यात शनिवार व रविवार हे दोन दिवस कडकडीत लॉकडाउन करण्याचे आदेश दिले आहेत. बीड शहरातील सुभाष रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, बार्शी नाका, नगर रोड या सर्व भागातील अस्थापना कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
कोविड सेंटर हाउसफुल
बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे कोविड सेंटर अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे आहे. या ठिकाणी एक हजारपेक्षा अधिक खाटा आहेत. मात्र हे कोविड सेंटरदेखील हाऊसफुल झाले आहे. याशिवाय बीड जिल्हा रुग्णालयदेखील हाऊसफुल झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळे उपाययोजना करत असल्याचे पाहायला मिळत आहे.