बीड - वीस वर्षांच्या राजकारणात आमचे काका जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीत भाजप शिवसेनेला मदत केली. केवळ स्वतःची निवडणूक आली, की लढायचं. मात्र, कार्यकर्त्यांची किंवा इतर कुठलीही निवडणूक असली, की राष्ट्रवादीत असतानाही अंधारातून भाजप-शिवसेनेला मदत करायची, असे म्हणत संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर बुधवारी हल्लाबोल केला.
बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन हातावर शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर बीडमध्ये राजकीय वातावरण तापले. जातीयवादी पक्षांबरोबर आमचे काका जात आहेत. बीड जिल्ह्यातील जनता त्यांच्या या निर्णयाबाबत त्यांना कधीच माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया पुतणे संदीप यांनी दिली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही क्षीरसागर यांच्या राजिनाम्यावर प्रतिक्रिया देताना हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसने व शरद पवार यांनी आमदार क्षीरसागर यांना अनेक मोठी पदे देऊन त्यांना काम करण्याची संधी दिली आहे. असे असतानाही त्यांनी पक्षाशी बेइमानी करत आमदारकीचा राजिनामा देऊन वेगळी वाट पकडली आहे. हा निर्णय त्यांनी का घेतला याबाबत मला काही सांगता येणार नाही. निकालानंतर बीड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसला लीड मिळेल. त्यानंतर त्यांना कोणीही पक्षात घेतले नसते, असे वाटले असावे, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.
एकंदरीत जयदत्त क्षीरसागर यांच्या राजिनाम्यानंतर बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत होते.