बीड - जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी कुठलाही आदेश न देता पाटोदा येथील तहसीलदार रूपा चित्रक यांनी परस्परच तहसील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी चौकशी करून तहसीलदार रूपा चित्रक यांच्यावर कडक कारवाई करण्याचे शब्द, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी महसूल कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी आपले आमरण लेखणी बंद आंदोलन मागे घेतले आहे.
गैरसमजुतीतून मागील दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी व कर्मचारी यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू होता. अखेर या संघर्षावर शनिवारी पडदा पडला. पाटोदा तहसीलदार रूपा चित्रक यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता पाटोदा येथील महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. ही बाब शनिवारी आंदोलनकर्त्यांशी बोलताना जिल्हाधिकारी यांनी समोर आणून दिली. त्यानंतर रूपा चित्रक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा शब्द जिल्हाधिकारी पांडे यांनी आंदोलनाला बसलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना दिला. यावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत दैनंदिन कामाला सुरुवात केली.
सध्या बीड जिल्ह्यात पिक विमा व पिक कर्जासाठी शेतकरी सातबारा मागत आहेत. अशा बिकट परिस्थितीत जिल्हा प्रशासनातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची मोठी गोची झाली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या संवादानंतर महसूल कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले असल्याचे, महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्याचबरोबर रूपा चित्रक यांना सक्तीच्या रजेवर देखील पाठवण्यात आले असल्याचे महसूल संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे.