बीड - बीड जिल्ह्यात आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या वतीने आष्टी तालुक्यातील सराटेवडगांव येथील नदी खोलीकरणाचे काम समाधान कारक सुरू असून हे काम पुर्ण झाल्यावर जिल्ह्यासाठी माॅडेल ठरेल, असे प्रतिपादन बीड जिल्हा आयसीआयसीआय फाऊंडेशनचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले. आष्टी तालुक्यातील सराटेवडगांव येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, नदी खोलीकरण कामाचे लोकार्पण व वृक्षरोपण सोहळा आयसीआयसीआय फाउंडेशन व सराटेवडगाव ग्रामपंचायत यांच्यामार्फत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्य अतिथी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बीड आनंद भंडारी यांच्यासह आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, आनंदवाडीचे सरपंच प्रा. राम बोडखे यांच्यासह आदी उपस्थित होते.
'कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच'
आयसीआयसीआय फाउंडेशनमार्फत केल्या गेलेल्या नदी खोलीकरण कामाचा आढावा मी घेतला असून, फाउंडेशनच्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तसेच, सर्व ग्रामस्थांनी आयसीआयसीआय फाउंडेशनच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे अहवानही भंडारी यांनी यावेळी केले. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक दिपक पाटील यांनी आयसीआयसीआय फाउंडेशनच्या कामाची माहिती दिली. तसेच, फाउंडेशनमार्फत आष्टी व पाटोदा तालुक्यातील 10 गावांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, त्यामध्ये ग्रामीण उपजीविका आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण मृद व जलसंधारण, वृक्ष लागवड रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट विषयी थोडक्यात माहिती दिली. सरपंच प्राध्यापक राम बोडखे यांनी गावाच्या कामाचा आढावा देत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास आयसीआयसीआय फाऊंडेशनचे विकास अधिकारी चेतन पाटोळे, समन्वयक यशवंत बहिरम, दशरथ सोनवणे व सराटे वडगाव आनंदवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.