बीड - स्वतः मात्र भाजपकडून मिळालेली आमदारकी राज्यभर मिरवायची मात्र जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना भाजपलाच विरोध करायला सांगायचे. हे दुटप्पी धोरण विनायक मेटे राबवत आहेत. मी गेली अनेक वर्ष मेटे यांच्याबरोबर काम केले आहे. मला माहीत आहे, मेटे हे ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे कधीच काम करत नाहीत. हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे, असा थेट आरोप राजेंद्र मस्के यांनी शनिवारी केला आहे.
बीडजवळ पालवण येथे शनिवारी राजेंद्र मस्के मित्र मंडळ यांच्यावतीने आयोजित बीड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता बैठक कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र मस्के बोलत होते. बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी पंकजा मुंडे यांना कडवा विरोध केला आहे.
राज्यात भाजप बरोबर असलो तरी जिल्ह्यात भाजपबरोबर राहणार नाही, अशी भूमिका आमदार मेटे यांनी घेतली आहे. मेटे यांच्या भूमिकेला टक्कर देण्यासाठी आता राजेंद्र मस्के जे अनेक वर्ष आमदार विनायक मेटे यांच्या बरोबर राहिलेले असून त्यांच्याच तालमीत वाढलेले आहेत. ते आता बीड विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
राजेंद्र मस्के हे पूर्वी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्या बरोबर काम करत होते. मात्र, त्यांनी शिवसंग्रामला सोडचिठ्ठी देत राजेंद्र मस्के मित्र मंडळ अंतर्गत काम सुरू केले, असून मेटेंना राम-राम ठोकला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीड मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत.
यावेळी कार्यकर्ता बैठकीत बोलताना राजेंद्र मस्के म्हणाले, की शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आहे. पूर्वी शिवसंग्राममध्ये काम करत होतो. जनतेला दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करत आलो. मात्र, ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केले त्यांनीच आमचे पंख छाटण्याचे काम केले असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, की जोपर्यंत जनता माझ्या पाठीशी आहे. तोपर्यंत मी कोणालाही भिणार नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे सांगत मस्के पुढे म्हणाले की, आमदार विनायक मेटे पक्षात असतात त्या पक्षाचे ते कधीच काम करत नाहीत. हा माझा फार जुना अनुभव आहे, असा थेट आरोप त्यांनी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यावर केला आहे.