नाशिक - गेल्या वर्षी दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे तोंडाशी आलेला घास गेल्यामुळे दिवाळी सणावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातूर वातावरणात दिवाळी सण साजरा करण्यात व्यस्त आहे. यावर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे उत्पन्नात वाढ होणार, अशी शेतकऱ्याला आशा होती. त्यात व्यापारी वर्गाने घाऊक माल खरेदी केला. मात्र, शेतकऱ्याच्या हातात अती पावसामुळे हातात पैसा आला नाही. त्यामुळे व्यापारात गुंतवलेला पैसा निघतो की नाही अशा द्विधा मनस्थितीत व्यापारी सापडलेला आहे.
हेही वाचा - वर्ध्यात दिवाळी दिवशीच बहीण भावाचा बुडून मृत्यू; तलावात आढळले मृतदेह
दिंडोरी तालुका द्राक्ष पंढरी मानला जातो. सप्टेंबर महिन्यात द्राक्ष पिकाच्या छाटणीला सुरूवात होत असते. त्यात ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला पाऊस सुरुवातीला सर्वच पिकाला जीवदान देणारा ठरला होता. मात्र, सततच्या पावसाने द्राक्ष पिकावर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने हा पाऊस नकोसा वाटायला लागला. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तर त्याची दिवाळीही अंधारात जाण्याची शक्यता आहे.