बीड- मागील २० महिन्यांपासून जिल्ह्यातील गटसचिवांचे वेतन थकित आहे. जिल्ह्यातील सहकारी सोसायटी यामुळे अडचणीत आल्या आहेत. आता जर आमचे वेतन दिले नाही, तर आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका घेत कर्मचाऱ्यांनी मागील ५ दिवसांपासून गटसचिव संघटनेने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अनेक कर्मचाऱ्यांवर थकित वेतनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. काही कर्मचाऱ्यांच्या मुलींचे लग्न असतानादेखील वेतन मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. शहरातील जालना रोड मार्गावरील उपनिबंधक कार्यालयासमोर गेल्या ५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की बीड जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायटीचे थकित वेतन व २ टक्के गाळा देण्यात यावा ही आमची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कृषी सन्मान योजना यशस्वी करण्यासाठी रात्रीचा दिवस केला व योजना यशस्वी करून दाखवली. असे असतानाही बँकेकडून कर्मचाऱ्यांना चुकीची वागणूक दिली जात आहे. गेल्या २० महिन्यांपासून थकित वेतन दिले जात नाही. या सर्व प्रकारामुळे गटसचिव आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
जोपर्यंत जिल्ह्यातील गटसचिवांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे गटसचिव संघटनेचे जिल्हा सरचिटणीस ठकसेन तुपे, गटसचिव महादेव कोळी, राजेंद्र जिनेकरांनी सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांनी उपनिबंधक कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.