बीड - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. विनाडॉल्बी व विनावर्गणी अशी संकल्पना असलेल्या या शिवजयंती उत्सवात राज्यातील साडेसातशेहून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. अनेक पारंपरिक कला यावेळी नागरिकांना पहायला मिळणार आहेत. ३ राज्यातील कलाकार व झांज पथक हे शिवजयंतीचे मुख्य आकर्षण आहे, अशी माहिती शिवजयंती उत्सव समितीचे प्रमुख संदीप क्षीरसागर व अध्यक्ष भाऊसाहेब डावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे १० वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही वेगवेगळ्या राज्यातील कलावंतांचा ताफा शिवजयंती उत्सव समितीमध्ये सहभागी होणार आहे. यामध्ये तामिळनाडू, मणिपूर, पंजाब येथील कलाकार मिरवणुकीत सहभागी होतील. पारंपरिक कलेचे सादरीकरण होणार आहे. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मिरवणूक निघणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा जवानांना श्रद्धांजली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्सव समितीची सुरुवात होणार आहे.
शहरातील सुभाष रोड मार्गावर जयंती उत्सव समितीची मिरवणूक पाहण्यासाठी बीड शहर व परिसरातील हजारो नागरिक गर्दी करतात. यावेळी महिलांसाठी विशेष व्यवस्था संयोजन समितीने केली असून सुभाष रोडवर केवळ महिलांसाठी मिरवणूक पाहायची व्यवस्था केली आहे. २५ हजाराच्या जवळपास शिवप्रेमी या मिरवणुकीत सहभागी होत असतात, यावर्षीही नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे, आवाहन संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, नगरपालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष विजय पवार, अमर नाईकवाडे आदींची उपस्थिती होती.