बीड- माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंकडे भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून पाहिला जातो. मराठवाड्यात वंजारी समाजाची लोकसंख्या चार ते साडे चार टक्के असली तरी बहुसंख्यांकांच्या बरोबरीच्या आसपास जाऊन ती निर्णायक ठरते. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपचा ओबीसी चेहरा बनल्या आहेत. आजही मराठवाड्याच्या राजकारणात पंकजा मुंडेचा प्रभाव दिसून येतो आहे. त्यामुळे भाजपचे नेते पंकजा मुंडे यांच्या नाराजीला दुर्लक्षित करणार नाहीत, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
१२ डिसेंबर रोजी पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांच्या रूपाने मराठवाड्याच्या राजकारणामध्ये एक ओबीसी चेहरा तयार झाला आहे. माळी, धनगर आणि वंजारी या ओबीसी जातीसमूहांतील एखाद्या नेत्याला मान्यता मिळण्याचे गोपीनाथ मुंडे हे पहिलेच उदाहरण होते. आणि त्यांचा तोच वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे चालून आला आहे. त्यामुळे मराठवाड्यात पंकजा मुंडे यांचे राजकीय वजन मोठे आहे. यामुळे त्यांच्या भूमिकेकडे विशेषतः भाजपचे जास्त लक्ष असणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
बीड, परभणी, नगरच्या अलीकडील जामखेड, कर्जत, पाथर्डीचा भाग, नाशिक आणि बुलडाणाच्या काही भागात वंजारी समाज एकत्रित आलेला आहे. हाच तिथल्या राजकीय निर्णयाला कारणीभूत असतो. मराठवाड्यातील पाच ते सहा मतदार संघांत, उत्तर महाराष्ट्रातील मतदार संघांत, विदर्भातील मतदार संघांत पंकजा मुंडेचा प्रभाव निर्णायक असतो. साधारणत: 15 विधानसभा मतदार संघांशिवाय जिथे पंकजा मुंडेंची भूमिका म्हणजेच वंजारी समाजाची भुमिका असते. हे सगळे मतदार संघ भाजपचा गड राहिलेले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये पंकजा गेल्या तर गेल्या अशी म्हणण्याची हिम्मत होत नाही. ओबीसी समाजाचे एकत्रित नेतृत्व पंकजा सोडल्या तर सांगता यावे असा कोणीही नेता दिसत नाही. पंकजा मुंडेंचे हेच बलस्थान भारतीय जनता पक्षात असल्याने पंकजा मुंडे या भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून समोर असतात. एकूणात त्यांना डावलणे भाजपला शक्य नाही. गोपीनाथ गडाच्या मेळाव्याला पंकजा काय भूमिका घेतील याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.