बीड - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र दीड वर्षाच्या मुलीच्या आईची ममता लॉकडाऊन कशी करणार ? असे असतानाही कर्तव्य श्रेष्ठ मानून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक मीना तुपे या मागील एक महिन्यापासून आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीपासून दूर राहत आहेत.
पंधरा ते सोळा तास पोलिसांना रस्त्यावर उभे राहून काम करावे लागत आहे. आम्ही आमचा जीव धोक्यात टाकून कर्तव्य पार पाडत आहोत. अशा परिस्थितीत आमच्यापासून कुटुंबीयांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी मी माझ्या कुटुंबापासून स्वतःला आयसोलेट केले आहे. हे सांगताना उपनिरीक्षक मीना तुपे यांच्या खाकीतील वात्सल्य दिसून येत होते. आई आपल्याला जवळ घेत नाही याचे दुःख परीच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळाले.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेतील विविध विभाग जीवाची परवा न करता पंधरा ते सोळा तास काम करत आहेत. यामध्ये पोलीस विभागावर देखील मोठा ताण पडत आहे. गेल्या महिनाभरापासून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक मीना तुपे या आपले कर्तव्य पार पाडत आहेत. नोकरी बरोबरच कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी मीना तुपे समर्थपणे पार पाडत आहेत. त्यांना एक दीड वर्षाची परी नावाची मुलगी आहे. ती एक महिन्यापासून आपल्या आईजवळ गेलेली नाही. कोरोनाच्या बंदोबस्तामुळे मीना तुपे या सतत कर्तव्यावर असतात. अशा परिस्थितीत कुटुंबाला धोका होऊ नये, म्हणून त्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे. घरातच त्यांची एक स्वतंत्र खोली आहे. त्या खोलीमध्ये कुटुंबातील एकही व्यक्ती येत नाही. एवढेच काय तर दीड वर्षाच्या मुलीला देखील मीना तुपे यांच्या खोलीमध्ये जाऊ दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी आई आपल्याला जवळ घ्यायची, मात्र आता ती अशी का वागते, याचे भाव दीड वर्षाच्या परीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. कोरोना व संचारबंदी हे परीला कळत नसले तरी आपल्याला घेत नाही, याचे दुःख परीच्या चेहऱ्यावर दिसत होते. याशिवाय आपण आपल्या दीड वर्षाच्या मुलीला जवळ घेऊ शकत नाहीत, याचे शल्य बोचत असल्याचे देखील आई म्हणून मीना तुपे यांच्या बोलण्यातून जाणवत होत.
मुलीला मी एक महिन्यापासून जवळ घेऊ शकलेले नाही, हे सांगताना 'खाकीतील वात्सल्य' दिसून येते. कोरोना विषाणूचा संसर्ग देशभरात सुरू झाल्यापासून पंधरा ते सोळा तास काम करावे लागते. ते काम करणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही पोलिसांनी या बिकट परिस्थितीत जबाबदारी घेतली आहे, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दीड वर्षाच्या मुलीपासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील मीना तुपे यांना सलाम...