बीड - शहराच्या खंडेश्वरी मंदिराजवळ मतदारांना पैसे वाटप करताना एका व्यक्तीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून 1 लाख 26 हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास खंडेश्वरी मंदिर परिसरात सुरेश बनसोडे हा मतदारांना पैसे वाटत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. त्याच्या दुचाकीतून 1 लाख 26 हजाराची रोकड जप्त करण्यात आली असून सुरेश बनसोडे सह राम इगडे यांच्या विरूद्ध पेठबीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला आहे. मात्र, मतदार धनशक्तीला थारा देणार नाहीत असेही संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
त्या रकमेशी शिवसेना उमेदवाराचा संबंध नाही -
दरम्यान खंडेश्वरी मंदिर परिसरात पकडण्यात आलेल्या रकमेशी शिवसेना उमेदवाराचा कसलाही संबध नाही. पराभवाच्या भीतीने राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर स्टंटबाजी करत असून लोकांना हातपाय तोडण्याची भाषा करत आहेत. नागरिकांनी यावर विश्वास न ठेवता निर्भीडपणे मतदान करावे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी म्हटले आहे.