बीड - अॅट्रॉसिटीचा कायदा जेवढा कडक करता येईल तेवढा करण्यासाठी माझे प्रयत्न राहिलेले आहेत. दलित समाज बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. असे असताना मी राज्यघटना बदलण्याचे बोलले, असे कटपेस्ट केलेला चुकीचे व्हिडिओ विरोधकांनी जाणीवपूर्वक सोशल मीडियावर फिरवला व माझ्यावर घटना बदलत आहे, असा आरोप केला. व्हिडिओ कट करुन आरोप करता येऊ शकतात पण जनतेचा विश्वास मिळवता येत नाही, अशी टीका मंत्री पंकजा मुंडे यांनी केज येथील जाहीर सभेत केली.
राज्यातल्या दलित समाजाला न्याय मिळावा म्हणून मी व माझ्या पक्षाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे यांनी आष्टी येथील एका सभेत म्हटले होते की, चिक्की खाण्याएवढे घटना बदलणे सोपे नाही. धनंजय मुंडे यांच्या या विधानाला पंकजा मुंडे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर दिले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे यांनी केज येथे सभा घेतली व त्यानंतर परळी शहरातून रॅली काढून आपले शक्तीप्रदर्शन केले. अॅट्रॉसिटीच्या कायद्यायासाठी माझी भूमिका सतत सकारात्मक राहिलेली आहे. मी व माझा पक्ष दलितांच्या विकासासाठी कार्यतत्पर आहे, अशा परिस्थितीत मी घटना बदलण्याची भाषा कशी काय करू शकते. विरोधक व्हिडिओची मोडतोड करून व कटपेस्ट करून लोकांची दिशाभूल करत आहेत.
मात्र, मला या निमित्ताने इथे सांगायचे आहे की, व्हिडिओची मोडतोड करून लोकांचा विश्वास जिंकता येत नाही. असा टोला धनंजय मुंडे यांना व इतर विरोधकांना पंकजा मुंडे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच्या शेवटच्या प्रचारसभेत लगावला. यावेळी पंकजा मुंडे यांच्या सभेला शहानवाज हुसेन यांची उपस्थिती होती.