मुंबई - राज्यात कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. जनतेचे आरोग्य ही आमची देखील प्राथमिकता आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटते असे असले तरी आर्थिक घडी मात्र विस्कटली जाऊ नये आणि हातावर पोट असणारांचे हाल होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, कोरोनाचा प्रश्न हा कोण्या एका राज्यापुरता मर्यादित नसून तो देशाचा प्रश्न बनला आहे. महाराष्ट्रात पुन्हा वाढलेली कोरोना रूग्णांची संख्या चिंताजनक आहे, पण जनतेनी घाबरून जाता कामा नये. हा विषय राजकारणाचा नाही, एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतोय. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य, व्यापारी, छोटे व्यावसायिक, सर्व सामान्य जनतेत चिंतेचे वातावरण आहे. रोजगाराची समस्या देखील निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत लोकांना अन्न सुरक्षा कशी देता येईल याचा विचार व्हावा.
केंद्र सरकारवरील आरोप चुकीचा -
सत्ताधाऱ्यांकडून केंद्र सरकारवर होणारी टिका अतिशय चुकीची आहे. महाराष्ट्राला मदतीबाबत केंद्राकडून कसलाही दुजाभाव नाही. केंद्राकडे संपूर्ण देशाचे पालकत्व आहे, त्यामुळे आरोप करणे चुकीचे असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. कोरोनाच्या या कठीण समयी राज्य सरकारने छोटया व्यापाऱ्यांना सवलती द्याव्यात, आरोग्य सेवा कायमस्वरूपी सक्षम करावी असे सांगतानाच सर्व राजकीय पक्षांनी अशा वेळी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे त्या म्हणाल्या.
कटाक्षाने नियम पाळणे आवश्यक -
कोरोनाचं गांभीर्य सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायजर वापरा, सामाजिक अंतर राखा, स्वतः नियम पाळा आणि इतरांनाही ते पाळायला सांगा, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी एकजूटीने लढा द्यावा असेही त्यांनी सांगितले.