परळी (बीड) - गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची व्रजमुठ बांधून मराठा आरक्षण व ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच संपुर्ण महाराष्ट्राचा दौरा करून गावागावात पोहचणार असल्याचे भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आरक्षणाचा प्रश्न आणि राज्यातील कोरोनाची स्थिती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्या गोपीनाथ गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर राज्यातील जनतेशी फेसबुकवरून संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.
'सरकारने मराठा आरक्षणावरुन खोटे बोलू नये'
गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त बोलतांना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेच्या आठवणींना उजाळा देतांना जनतेशी संवादही साधला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, की गेल्या वर्षभरात मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. मराठा समाजाचा प्रत्येक तरुण मला ट्विटरवर, फेसबुकवर मेसेज करत आहेत, की गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावरून आम्हाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. आज ते असते तर मराठा तरूणाला आरक्षणासाठी असे दारोदार फिरायची वेळ आली नसती. आज बहुजन समाजाचा मोठा प्रश्न आहे. आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी फक्त आपल्या पोळ्या भाजण्याचे काम केले आहे. ही नवी पीढी आहे. यांना खोटे सांगू नका, खरे सांगा. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देता हे सांगा. तुम्ही सोळा टक्के होत नाही म्हणता, मग आम्हाला टक्के सांगा. आम्ही तयार आहोत, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-कोरोना संकट : 'आभाळमाया' देणाऱ्या वृद्धाश्रमात मिळतेय जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा