बीड - सबंध राज्यभरातील ओबीसी समाजाचा हा मोर्चा कोणाला टार्गेट करण्यासाठी नाही तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी आहे. इतर कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचे तर द्या, मात्र ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्या, असे मत ओबीसी नेते पंकज भुजबळ यांनी व्यक्त केले. बीडमध्ये ओबीसी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. याप्रसंगी सबंध राज्यभरातून ओबीसी बीडमध्ये दाखल झाले होते. याप्रसंगी ओबीसी नेते पंकज भुजबळ, समता परिषदेचे ॲड. सुभाष राऊत, गणेश हाके, पी. टी. चव्हाण आदींची ओबीसी मोर्चामध्ये उपस्थिती होती.
बीड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथून या ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा सुरुवात झाली होती. सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
'मराठा आरक्षणाला विरोध नाही'
यावेळी समता परिषदेचे ॲड. सुभाष राऊत म्हणाले, की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्या, येणाऱ्या काळात मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध राज्यभरातील ओबीसी समाज आरक्षण बचाव आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
'ओबीसीमध्ये इतर कोणाला आरक्षण देणे म्हणजे ओबीसी समाजावर अन्याय'
पंकज भुजबळ म्हणाले, की 450 जाती-जमातीसाठी हे 17 ते 19 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये इतर कोणाला आरक्षण देणे ओबीसी समाजावर अन्याय असेल, सरकारला ज्यांना आरक्षण द्यायचे त्यांना द्यावे, मात्र ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्यावे, हीच आमची भूमिका आहे, असे ते म्हणाले.