बीड - जिल्ह्यातील आष्टी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर मंगळवारी पहाटे पोलिसांची जीप आणि एका कारची समोरासमोर धडक झाली. यात एका जणाचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले आहेत. बाळासाहेब दादाराव देवगडे (वय ४५) असे मृताचे नाव असून जखमींवर आष्टी आणि नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केज तालुक्यातील लव्हरी गावातील देवगडे हे सध्या डोंबिवली येथे राहतात. सोमवारी रात्री डोंबिवलीवरून आपल्या मूळ गावी लहूरी (ता.केज) येथे नातेवाईकांसोबत कारने (एमएच 0१ बीके ९२४९) जात होते. आज पहाटे आष्टी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किमी अंतरावर पोलीस जीप ( एमएच २३ एफ १११७ ) आणि त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील बाळासाहेब दादाराव देवगडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
किशोर बाळासाहेब देवगडे ( २३ ) वसंत डागे (२५, रा कोल्हेवाडी ता केज ), सुमन वसंत डांगे (२३, रा. कोल्हेवाडी ता केज), सोनाली देवगडे ( २०,रा लाहूरी ता केज) यांच्यासह आर्यन आणि आराध्या ही दोन चिमुकली जखमी झाली. त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.