आष्टी (बीड) - तालुक्यातील कडा धामणगांव रस्तावरील देवी निमगांव येथील देवीच्या मंदिरात आठ ते दहा दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळुन आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने नागरिकांत वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत. या घटनेने माता तु कशी झाली वैरीण, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मंदिरात लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला -
या बाबतीत अंभोरा पोलिसांनी अधिक माहिती दिली, आष्टी तालुक्यातील देवी निमगांव येथे जगदंबा देवीचे मंदिर कडा-धामणगांव रस्त्यावर आहे. याठिकाणी गुरूवारी सकाळी सातच्या दरम्यान बिट्टू पोकळे यांनी फोन करून अंभोरा पोलिसांना मंदिरात लहान बाळाचा रडल्याचा आवाज येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बेवारस टाकलेल्या अर्भकाची पाहणी केली असता ते स्त्री जातीचे अर्भक दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून आष्टी ग्रामीण रूग्णालयात बाळाला आणून उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी अंभोरा पोलिसांत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पो. हो. विठ्ठल थोरवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे अर्भक संचारबंदीची संधीसाधुन बाहेर गावातील कुणी तरी रात्री हे अर्भक आणून टाकले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. या बाबतीत पुढील तपास पोलीस करत आहेत.