बीड - जिल्हा रुग्णालयाने कोरोना संभाव्य 62 जणांचे रिपोर्ट प्रयोगशाळेकडे पाठवले होते. यापैकी 2 रुग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 4 रुग्णांवर उपचार सुरू सुरू आहेत. आत्तापर्यंत 475 च्या जवळपास व्यक्तींचे कोरोना संदर्भाने नमुने बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने तपासण्यात आले आहेत. सोमवारी आढळून आलेले दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुंबई येथील कांदेवलीवरून बीडला आले होते.
चार दिवसांपूर्वी पर्यंत बीड जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. मात्र, आता हळूहळू कोरोनाने जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पुणे-मुंबई येथून बीड जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बीड जिल्ह्यातील गावे असुरक्षित असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी बीड जिल्ह्यात सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी एका 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, आजघडीला बीड जिल्ह्यात एकूण 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. रविवारी सापडलेल्या त्या सात रुग्णांपैकी सहा रुग्ण सोमवारी पुण्याला रवाना झाले आहेत. सध्या बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, हे रुग्ण आढळून आलेल्या माजलगाव तालुक्यातील काही गावे सील करण्याचे नियोजन प्रशासनाने सुरू केले आहे.
कांदिवलीवरुन आले होते बीडला -
सोमवारी माजलगाव तालुक्यातील ते दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुंबई येथील कांदिवली येथून बीडला आले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. कोरोनाचे लक्षण दिसल्यानंतर रविवारी सकाळी त्या दोघांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यात दोघांचेही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले.