बीड - धुणे धुण्यासाठी आईसोबत गेलेला चिमुकला नदीपात्रात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी मातेने शर्थीचे प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. आज मातृत्वदिनी मातेच्या वात्सल्याने संगम जळगावचे (ता. गेवराई) ग्रामस्थ गहिवरले.
हेही वाचा - बीड : तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा
पल्लवी गोकुळ ढाकणे (वय ३५) व समर्थ गोकुळ ढाकणे (वय ४) असे त्या माय-लेकाचे नाव आहे. संगम जळगाव येथील गोदापात्रात पल्लवी या आज सकाळी नऊ वाजता धुणे धुण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी त्यांचा मुलगा समर्थ मागे लागला. 'मी धुणं धुवून येते', असे समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु रडू लागल्याने त्यांनी त्यास सोबत नेले. नदीकाठी त्या धुणे धुण्यात मग्न असताना खेळता खेळता समर्थ हा पात्रात उतरला. नाकातोंडात पाणी गेल्यानंतर तो बुडू लागला. मुलगा बुडत असल्याचे पाहून पल्लवी यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, मुलाला वाचविताना मातेचाही बुडून मृत्यू झाला.
यावेळी काही तरुणांनीही पाण्यात उड्या घेतल्या, पण तोपर्यंत उशीर झाला होता. गेवराई पोलिसांनी धाव घेतल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यासाठी मातेने जिवाची बाजी लावली. दुर्दैवाने हे प्रयत्न निष्फळ ठरले. मातृत्वदिनी मातृत्वाच्या प्रत्यय आल्याने कुटुंब, नातेवाईक व ग्रामस्थांनाही गलबलून आले होते.
हेही वाचा - बीड : लसीकरण केंद्र वाढवा; परळी भाजपची मागणी