बीड - ऐन तारुण्यात आलेले वैधव्य पचवताना होत असलेली आयुष्याची फरफट गंभीर स्वरूपाची आहे. यातच भीषण दुष्काळामुळे 'एकल' महिलांचा जगण्याचा प्रश्न मराठवाड्यात गंभीर झाला आहे. केवळ बीड जिल्ह्यात 45 ते 50 हजार इतकी 'एकल' महिलांची संख्या आहे. जिल्हा प्रशासन 40 हजार मजुरांना आम्ही रोजगार हमी योजनेतून काम देतो असा दावा करत असले तरी दिवाळीपासून म्हणजेच मागील 6 ते 7 महिन्यापासून हाताला काम नसल्याचे एकल महिलांनी सांगितले.
अशा परिस्थितीत आम्ही जगायचे कसे असा सवाल जिल्ह्यातील एकल महिलांनी उपस्थित केला आहे. बीड तालुक्यातील दोन एकल महिलांच्या जगण्याचा संघर्ष व त्यांची कैफियतीचा घेतलेला हा आढावा.....
सुनिताचा संघर्ष -
बीड तालुक्यातील तळेगाव येथील सुनिता अशोक सुरवसे या 29 वर्ष वय असलेल्या शेतकरी कुटूंबातील महिलेच्या पतीने 5 वर्षांपूर्वी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिताला 2 मुलं व 2 मुली आहेत. त्यांना एकरभर जमीन आहे. घरातला कर्ता पुरुष गेला म्हटल्यावर संसाराचा गाडा हाकायचा कसा? असा प्रश्न सुनिता यांच्यासमोर आहे.
मुलींचे शिक्षण थांबले -
लोकांच्या शेतात मोलमजुरी करून मुलांना लहानाचे मोठे केले. सुनिता यांची पहिली मुलगी नववी इयत्तेत शिक्षण घेत होती. मात्र गेल्या वर्षी तिला घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागली. आता ती घरीच असते. दोन नंबरची मुलगी औरंगाबाद येथे एका सेवाभावी संस्थे मदतीने सहावीच्या वर्गात शिक्षण घेते व तीन नंबरचा मुलगा चौथीत तर चार नंबरचा मुलगा दुसरीमध्ये शिक्षण घेत आहे. अशा परिस्थीतीतही सुनिताने खंबीरपणे संसाराचा गाडा 5 वर्ष ओढला. मात्र यावर्षी भीषण दुष्काळ पडला आणि लेकरांच्या व स्वतः सुनीताच्या आयुष्याची फरफट सुरू झाली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कामे पूर्णपणे थांबलेली आहेत. तळेगाव परिसरात शासनाचे एकही काम सुरू नाही.
एक वर्षापासून मिळेना विधवा पेंशन योजना -
राज्य शासनाकडून विधवा महिलांना उदरनिर्वाहासाठी पेन्शन योजना आहे. ही पेन्शन योजना मिळावी यासाठी सुनिता सुरवसे गेल्या एक वर्षापासून शासन दरबारी चकरा मारत आहे. तरी देखील त्यांना पेन्शन योजना मंजूर होत नाही. शेवटी तिने विधवा पेन्शन योजनेचा नाद सोडून दिला.
माझ्या नवऱ्यांची आत्महत्या अपात्र ठरली - मनिषा
बीड तालुक्यातील दुसऱ्या एकल महिला मनिषा विनोद भडगिरे यांनी कैफियत मांडताना सांगितले की, 2016 मध्ये गळफास घेऊन माझ्या नवऱ्याने जीवन संपवले. आमच्याकडे एकूण 3 एकर जमीन आहे. ती जमीन देखील सासू-सासऱयांनी मला दिलेली नाही. एवढेच नाही तर शासनाच्या दृष्टीने माझ्या नवऱ्याची शेतकरी आत्महत्या अपात्र ठरवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत 2 मुले घेऊन मी परिस्थितीशी संघर्ष करते. असे मनिषा बडगिरे यांनी सांगितले.
दुकानाची उधारी कशी चुकवायची -
सहा-सात महिने झाले आमच्या हाताला काम नाही. शेतात दुष्काळी परिस्थितीमुळे काहीच पिकत नाही. अशा बिकट परिस्थितीत जगायचं कसं असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. गावातल्या किराणा दुकानदाराकडून आतापर्यंत आम्ही उदाहरण किराणा आणलेला आहे. काम लागल्यावर त्यातून आलेल्या पैशाने उधारी देऊ असा शब्द दुकानदाराला दिले आहे. मागच्या सहा सात महिन्यात केवळ किराणा दुकानाची 20 हजार रुपये उधारी आमच्याकडे झाली असल्याचे सुनीताने 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. ही उधारी कशी चुकती करायची हा प्रश्न असल्याचे सुनिताने सांगितले.