बीड - जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या पाणी नियंत्रण कक्ष, गौण खनिज व जीपीएस प्रणालीचा आज रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी कंट्रोल रुम कशी हाताळत आहोत याची माहिती यावेळी दिली. जीपीएस प्रणालीमुळे वाळू चोरी रोखली जात असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले.
दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यामध्ये अजूनही गावागावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरमध्ये गैरकारभार होऊ नये यासाठी जीपीएस प्रणाली टँकरवर राबवण्यात आली आहे. ती अत्यंत यशस्वी झाल्याने आता जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून वाळू माफियांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी वाळू माफियांवर नियंत्रण आणण्यासाठी गौण खनिज वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनातून टँकर आणि वाळू माफियांवर नियंत्रण ठेवण्याचे काम जिल्हाधिकारी पांडे हे करत आहेत. त्यांचा हा पॅटर्न चांगलाच प्रभावी ठरत आहे. त्यामुळे शुक्रवारी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनातील जीपीएस प्रणालीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर हे उपस्थित होते.