परळी (बीड) - जिल्ह्यात अनेक सहकारी संस्था उदयास आल्या आणि काही कालावधीनंतर त्या बंदही पडल्या. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी सहकार क्षेत्र महत्वाचे आहे, त्यामुळे सहकारातील संस्थांचे उत्थान व्हायला हवे. मराठवाड्यातील सहकारी संस्थांना नवसंजीवनी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. टोकवाडी येथे शेतकरी कापूस प्रक्रिया संस्थेच्या अद्ययावत अशा जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीचे उद्घाटन मंत्री मुंडेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुंडेंचे गौरवोद्गार -
ज्या संस्थेचा शुभारंभ स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या हस्ते 30 वर्षांपूर्वी झाला होता आज त्यांच संस्थेचा शुभारंभ पुन्हा नव्याने माझ्या हस्ते होत आहे हा नियतीचा वेगळाच खेळ असून हे माझे भाग्य आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके म्हणाले, मराठवाड्यातील पाण्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवायचा असेल तर पश्चिम वाहिनीचे समुद्रात जाणारे पाणी मराठवाड्यात वळवायला हवे. यामुळे शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. याबाबत मी स्वतः राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री आमदार प्रकाशदादा सोळंके यांची उपस्थिती होती. आमदार संजय दौंड, माजी आमदार विजयराव गव्हाणे, ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी बीड जिल्हा मजूर संस्थेचे अध्यक्ष बन्सी अण्णा सिरसाट, दादासाहेब मुंडे, वैद्यनाथ देवल कमिटीचे सेक्रेटरी राजेश देशमुख, जि.प.गटनेते अजय मुंडे, मार्केट कमिटीचे सभापती अॅड. गोविंदराव फड, प.स.सभापती बालाजी मुंडे, कापूस पणन महासंघाचे संचालक भरत चामले, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. याचबरोबर बीड-लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यातील 45 जिनिंगचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा - 'अजित पवार यांच्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रभाव'
खरेदी पुन्हा सुरू -
शेतकरी कापूस सहकारी संस्था या संस्थेची नोंदणी 1988-89 साली झालेली आहे. 11 झोनपैकी राज्यातील खरेदीत सदैव प्रथम असणार्या परळी झोनमध्ये बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होतो. सुरूवातीच्या काळात या संस्थेकडे 12 डिआर मशिन होते. आता 36 डीआर या अद्ययावत मशीनची उभारणी करण्यात आली आहे. त्यावेळी कापसाची रूई परभणी येथे प्रेसिंगसाठी पाठवावी लागत असायची. मध्यंतरीच्या काही कालावधीसाठी कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदी बंद केली होती. मात्र, 2011-12 पासून ही खरेदी पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आलेली आहे.
शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अद्ययावत अशा जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीचे आज नव्याने उदघाटन होत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे अॅड विष्णुपंत सोळंके यांनी प्रास्ताविकात सांगितले. तसेच माजलगाव मतदारसंघ आणि परळी मतदारसंघात विकासाचा सुवर्णमध्य साधण्यासाठी मुंडे आणि प्रकाश यांना एकाच व्यासपीठावर आपण बोलावले असल्याचे ते याप्रसंगी म्हणाले.