गेवराई (बीड)- आपल्या मातीतील माणसांशी नाळ जुळली असल्यामुळे अमरसिंह पंडित यांनी लोकसेवेचा वसा घेतला आहे. कोरोना संक्रमण काळात त्यांनी केलेले कार्य लोक विसरणार नाहीत. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काम करणे माझे कर्तव्य आहे, ही मुले जेव्हा मोठमोठे अधिकारी होतील तेव्हा माझ्या कामाचे चीज होईल आणि खऱ्या अर्थाने मी त्यावेळी सत्कारास पात्र होईल, अशी भावना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कोविड योध्दा सन्मान आणि नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सतिष चव्हाण, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संजय दौंड यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
![कोविड योध्दा सन्मान आणि नागरी सत्कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-parlivaijnath-10081_13062021225621_1306f_1623605181_811.jpg)
![कोविड योध्दा सन्मान आणि नागरी सत्कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-parlivaijnath-10081_13062021225621_1306f_1623605181_601.jpg)
अमरसिंहांचाही लवकरच सन्मान केला जाईल- मुंडे
कोरोनाच्या संक्रमण काळात अमरसिंह पंडित यांनी गेवराईमध्ये पहिले खासगी कोविड सेंटर उभे केले. तसेच पंडित यांनी कोरोनाच्या महामारीत लोकांचे प्राण वाचविणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मानसुध्दा सर्वप्रथम आयोजित केला. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध करणाऱ्या अमरसिंह पंडित यांचादेखील सन्मान लवकरच होईल, असे संकेतही धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात दिले. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी गेवराई तालुक्यात वसतिगृह उभारण्याची आग्रही भूमिका अमरसिंह पंडित यांनी घेतली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गेवराईत लवकरच १०० मुले आणि १०० मुलींचे वसतिगृह उभारणार असल्याचेही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
![कोविड योध्दा सन्मान आणि नागरी सत्कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-parlivaijnath-10081_13062021225621_1306f_1623605181_159.jpg)
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह योजना सुरू करून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण करून त्यांचा वारसा धनंजय मुंडे चालवत आहेत, असे कौतुक अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई तालुक्यातील लोकांनी सर्वाधिक सामाजिक सहभाग या कोरोनाच्या संकटात दिल्याचे सांगताना त्यांनी विविध संघटना, सामाजिक संस्था व व्यक्तिंच्या मदतकार्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात केला.
![कोविड योध्दा सन्मान आणि नागरी सत्कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-parlivaijnath-10081_13062021225621_1306f_1623605181_201.jpg)
सर्व डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील स्टाफ यांच्यावतीने प्रातिनिधीक स्वरुपात वैद्यकीय अधीक्षक डॉ.महादेव चिंचोळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांना सन्मानित करण्यात आले. आशा स्वयंसेविका कार्यकर्ती यांच्यावतीने ज्योति वाघमोडे, संजीता मोटे, मिराबाई मिसाळ, उमा सुतार, सुबाना शेख आणि संजीता कोकणे यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला. सुमारे ४० वार्ड बॉयच्या वतीने गणेश महानोर, महेश धुंरंधरे आणि प्रदिप शेंबडे यांना शाल-श्रीफळ, आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. मृत रुग्णांच्या अंत्यसंस्कारा पर्यंतची कामे करणाऱ्या बालाजी करांडे यांचाही सन्मान झाला. कोरोना रुग्णसेवा समितीच्यावतीने अॅड.सुभाष निकम, बाळासाहेब सानप, कडुदास कांबळे आणि प्रशांत गोलेच्छा यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान झाला. तात्यासाहेब मेघारे, बाळासाहेब मस्के, शेख एजाज (ड्रायफ्रुटवाले) डॉ.सर्वोत्तम शिंदे, अक्षय पवार, संदिप मडके, अर्जुन सुतार आणि सौ.मुक्ता आर्दड या सामाजिक कार्यकर्त्यांचाही सोहळ्यात सन्मान करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांच्याहस्ते सर्वांचा सन्मान टाळ्यांच्या गजरात करण्यात आला.