बीड - केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील काही लोकांना टार्गेट केले जात आहे. अन्यायाच्या विरोधात बोलणार्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जाते. आतापर्यंत झालेले मोठमोठे घोटाळे झाकण्यासाठी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. खरे तर शाहरुख खान याने भाजपामध्ये प्रवेश केला तर पकडलेल्या ड्रग्सची पिठी साखर होईल व आर्यन खान निर्दोष सुटेल, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपाला लगावला आहे.
हेही वाचा - ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है…! नांदेडमध्ये छगन भुजबळांची तोफ धडाडली
'मोठे घोटाळे दाबण्याचा प्रयत्न'
बीडमध्ये आयोजित कृतज्ञता मेळाव्याप्रसंगी मंत्री भुजबळ बोलत होते. ओबीसींच्या राजकीय आरक्षणास अध्यादेश काढून संरक्षण दिल्याबद्दल हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, की बॉलिवूडला बदनाम करण्याचे काम सध्या सुरू आहे. 30 कोटींचे कोकेन कुणाचे आहे याकडे लक्ष जाऊ नये. त्याचबरोबर मोठ्यांचे पकडलेले घोटाळे दाबण्यासाठी स्टार असणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला पकडण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांसारख्या समजदार नेत्याने 'याचा' विचार करावा - छगन भुजबळ
ओबीसी मेळाव्याचे आयोजन
शाहरुख खानने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला तर त्या ड्रग्सचीदेखील पिठीसाखर होईल, अशी सडकून टीका मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर कार्यक्रमातून केली. ओबीसींच्या या मेळाव्याच्या प्रसंगी व्यासपीठावर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, बापूसाहेब भुजबळ, समता परिषदेचे अॅड. सुभाष राऊत आदींची उपस्थिती होती.