बीड - विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर हे सध्या मतदारसंघातील डोंगरपट्ट्यात कॉर्नर बैठका घेत प्रचार करत आहे. शनिवारी त्यांनी बोरफडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा... 'कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र?'
बाजारात आपण एखादी वस्तू खरेदी करताना सर्व बाजूने विचार करून खरेदी करतो. तसेच मतदान करताना देखील चौकस बुद्धी ठेऊन मतदान करावे लागते. विकासकामे करून दाखवावी लागतात. ती बोलल्याने किंवा फेकाफेकी केल्याने होत नसतात. बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. मी नेहमीच त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे आणि त्यांची विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे, असे वक्तव्य क्षीरसागर यांनी यावेळी केले.
हेही वाचा... माझी लढत थेट जयदत्त क्षीरसागर यांच्याशीच - अशोक हिंगे
पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, शिक्षण, आरोग्य आणि डोंगरी भागाचा जो विकास असतो, तो विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम आपण केले. या भागातील जनतेचा आपण नेहमीच आदर केला आहे. या निवडणुकीत आपल्याला संधी मिळाली तर त्या संधीचे सोने आपण करू, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. तसेच मतदारसंघातील या भागात ऊसतोड मजूर हातात कोयता घेऊन जीवन जगतो. तो कोयता घेणारा शेतकरी बागायतदार झाला पाहिजे. विकासकामे जलदगतीने करायची असतील तर सोंगंढोंगं करणार्यांना बाजूला सारा, गट तट विसरून आपल्याला मतदान करा, असे आव्हान त्यांनी यावेळी केले.