बीड - राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी- ६० पथकाच्या १५ जवानांना वीरमरण आले आहे. या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील तौसिफ शेख या जवानाचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे.
गडचिरोली येथील नक्षली हल्ल्यात हुतात्मा झालेला बीडचा शेख हे मूळचे पाटोदा येथील रहिवासी आहेत. पाटोदा येथील क्रांतीनगर भागात त्यांचे छोटेसे घर आहे. तौसिफ यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन २०११ मध्ये पोलीस सेवेत स्थान मिळविले होते. त्यांचे वडील शेख आरेफ हे हॉटेल कामगार आहेत, तर आई शमीम या आजही घरकाम करतात. तौसिफला लहान दोन मुले आहेत. त्यांच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी व एक भाऊ असा परिवार आहे.
क्रांतीनगर भागातील प्राथमिक शाळेत तौसिफ यांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले. तर पाचवी ते दहावी वसंतराव नाईक स्कूलमध्ये व अकरावी व बारावी पाटोदा येथील पी.व्ही.पी महाविद्यालयात झाले.
बुधवारी १ मे रोजी ही घटना घडल्यानंतर यामध्ये शेख तौसिफ या जवानाला वीरमरण आल्याचे कळल्यानंतर पाटोदा शहरातील क्रांतीनगर भागात त्यांच्या घरासमोर नागरिकांनी गर्दी केली होती. तौसिफ यांचे वडील व आईला दुःख अनावर झाले होते.