बीड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीच्या काळात पोलीस सर्वत्र पहारा देत आहेत. बीडमधील अशा ३०० पोलिसांना येथील 72 वर्षीय निलावती जगताप या मायेचा घास भरवत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
लॉकडाऊनच्या काळात कोणीही बाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्याच्या काळात ते कोरोनामुळे ते आपल्या घरीही जाऊ शकत नाहीत. त्यात हॉटेल अस्थापना बंद असल्याने दिवसभरात जेवण आणि पाण्याची त्यांना सोय नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेवा देणाऱ्या पोलिसांची सेवा करावी, असा विचार निलावती जगताप यांना आला. त्यांचा हा विचार त्यांच्या दोन्ही मुलांना तसेच सुनांना पटले. त्यानंतर सुरु झाला डबे पोहोचविण्याचे काम. सुरुवातील शंभर डबे पुरवत आज या माऊलींकडून 300 पोलिसांना मायेचा घास भरविला जातो.
पहाटे पाच वाजल्यापासून ते अकारा वाजेपर्यंत स्वयंपाक चालतो. यात त्यांच्या सुनाही हातभार लावतात. स्वयंपाक झाल्यानंतर डबे भरण्यात येते. त्यानंतर तीन वाहनांतून शहरातील विविध ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना डबे पोहोचविले जाते. हे काम निलावती जगताप यांचे दोन मुले माजी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप व किशोर जगताप करतात.
निलावती जगताप यांनी पाठवलेला जेवण डब्बा 24 तास खडा पहारा देणाऱ्या पोलिसांना आधार देत आहे. हे सगळं करण्यामागे आम्हाला मानसिक समाधान मिळत असून देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामध्ये लढा देणाऱ्यांसाठी खारीचा वाटा आपला असावा हा मूळ उद्देश आमचा आहे, असे निलावती जगताप म्हणाल्या .
डब्यात या पदार्थांचा असतो समावेश-
बीड येथील जगताप कुटुंबीय पोलीस कर्मचाऱ्यांसाठी देत असलेल्या डब्यामध्ये चार चपात्या, एक भाजी, डाळ, भात व एक गोड पदार्थ याचा समावेश असतो.
एका दिवशीच खरेदी केला जातो दोन दिवसांचा भाजीपाला
बीड जिल्ह्यात एक दिवसआड लॉकडाऊन असल्यामुळे दोन दिवसांसाठी पुरेल इतका भाजीपाला एकाच वेळी खरेदी करुन ठेवावा लागतो. संचारबंदी शिथिलतेच्या काळातच म्हणजेच सकाळी सात ते साडे नऊ या वेळेतच किराणा भरून ठेवावा लागतो लागणारा सर्व किराणा एकत्रित व एकदाच भरला असल्याचेही जगताप कुटुंबीयांनी सांगितले.
डबेही आणले विकत
जेव्हा पोलीस कर्मचारी व काही रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचा डबा पोहोचविण्याचे ठरले. तेव्हा साडेतीनशे जेवणाचे डबे विकत आणले. आता या उपक्रमाला सुरुवात करून पंधरा दिवसांचा अवधी उलटला आहे. अगदी वेळेवर पोलीस कर्मचारी यांना बंदोबस्ताच्या ठिकाणी जेवण डबे पोहोचवले जातात.
हेही वाचा - 'त्या' 40 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू...कारण अद्याप अस्पष्ट