बीड - बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हरभरा व आंब्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष यांनी शनिवारी केली आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकरी या ना त्या संकटात सातत्याने अडकत आहे. यावर्षी रब्बीची पिके काही प्रमाणात चांगली आली होती. मात्र अचानक 18 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यात पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे ज्वारीची पिके आडवी झाली आहेत. याशिवाय शेतकऱ्यांचा हरभरा देखील अवकाळी पावसामुळे भिजला आहे. बीड जिल्ह्यात रब्बी पिकाच्या उत्पादनावरच शेतकरी पुढच्या वर्षी चे नियोजन करत असतो. मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्याचे गणित बिघडले आहे. शासनाने तात्काळ बीड जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व मदत जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे शनिवारी केली.
केवळ घोषणा नको, थेट मदत द्या-
यापूर्वी झालेल्या नुकसानी संदर्भात शासनाने केवळ घोषणाबाजी करून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलेले आहे. यावेळी तसा प्रकार शेतकऱ्यांबरोबर सरकारने करू नये, प्रशासनाच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे गंगाभिषन तावरे यांनी देखील केली आहे.